Sunday, 2 December 2012

छोट्यांसाठी योगा


छोट्यांसाठी योगा

वाढत्या वयात जशी उत्तम आहाराची गरज असते तशीच व्यायामाचीही. मग मुलांना कोणता बरं व्यायाम द्यावा ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर योगासन हा चांगला पर्याय आहे. हा काही फक्त मोठ्यांनी करायचा व्यायामप्रकार नाही. मुलांसाठीही अनेक प्रकारची सोपी आसनं या प्रकारात आहेत.
नैसर्गिक पद्धतीने आणि मनोरंजनात्मक मार्गाने लहान मुलांना योगासन आणि व्यायाम करण्याची सवय लावली पाहिजे. अति उर्जेचं प्रमाण कमी करण्याबरोबरच उर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी या आसनांचा उपयोग होतो. उदा. अतिउत्साही मुलाला शांत आणि श्वासाचे व्यायाम द्यायला हवेत तर सतत एकाजागी बसून असणाऱ्या मुलांना उत्साह आणि उर्जा निर्माण करणाऱ्या व्यायाम प्रकारांची गरज असते.

तीन ते सहा वर्ष वयोगट

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तुम्ही मुलांना योगा शिकवायला सुरुवात करू शकता. या वयात शरीर आणि मनाची जडण घडण होण्याची प्रक्रिया सुरु असते. व्यायामाला सुरूवात करण्यापूर्वी त्यांच्या आवडीच्या गोष्टी सांगून त्यात त्यांना गुंतवून ठेवता येते. अनेक आसनं निसर्गातील विविध प्राण्यांच्या बसण्याउठण्याच्या पद्धतीवर बेतली आहेत. या गोष्टी थोड्या गमतीशीर करुन मुलांना सांगितल्यास मुलं व्यायाम आवडीने करतात.

सात ते तेरा वर्ष वयोगट

या वयोगटात योगा सत्र अधिक नियोजित आणि प्रभावशाली होऊ शकतात. एकाच सत्रात वेगवेगळ्या आसनांचा समावेश करता येतो. सूर्यनमस्कारासारखी आसनं या वयात शिकवता येतात.

तेरा वर्षाच्या पुढील गट

मोठ्या मुलांची क्षमता अधिक व्यायाम करायची असल्यामुळे थोडे पुढचे व्यायाम प्रकार त्यांना शिकवता येतात. एकाग्रता होण्यासाठी श्वासोच्छ्वासाचे काही सोपे व्यायाम या वयात मुलांना दिले पाहिजेत. शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही व्यायामाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 

No comments:

Post a Comment