डाएट ठेवा गुंडाळून
डाएट ठेवा गुंडाळून
दिवाळीच्या फराळाचा मोह
भल्याभल्यांना आवरत नाही. त्यासमोर डाएट-बिएटसारखे शब्द गुंडाळून बासनात
बांधले जातात. पण डाएटप्रेमींसाठी कमी फॅट्स , लो कॅलरीज असलेल्या फराळाचं फॅड वाढतंय. ते किती खरं किती खोटं हा मोठा प्रश्नच आहे.
कॅलरीज , फॅट्सचा तराजू तोलताना नाकीनऊ येतात. त्यातच दिवाळीसारखे सण आले की जिभेवर किती आणि का म्हणून नियंत्रण ठेवायचं ,
असा विचार करत आपला हात फराळाच्या डिशपर्यंत जातोच. पण वजनकाटा आणि मेडिकल
रिपोर्टचे आकडे आठवले की तो आपसूक मागेही येतो. मात्र आता हेल्थ कॉन्शियस
किंवा वजन कमी करण्याचा आटापिटा करणाऱ्यांसाठी फॅट्स आणि कॅलरीज कमी असलेले
फराळही बाजारात आले आहेत. त्याचं जोरदार मार्केटिंगही सुरू आहे. अगदी चकली
, करंजीपासून मिठाईपर्यंत सारं काही खास वजनाचा काटा सांभाळणाऱ्यांसाठी सज्ज आहे. पण हे पदार्थ खरंच हेल्दी आहेत का ? त्यामुळे वजन , कॅलरीज , फॅट्स यांवर काहीही परिणाम होणार नाही का ? याचा विचार करण्याची गरज आहे.
याबाबत आहारतज्ज्ञ ज्योती लालवानी यांनी सांगितलं की , डाएट फराळच काय ,
अशा कोणत्याही पदार्थांवर हवा तसा ताव मारला जातो. एका करंजीऐवजी दोन-तीन
करंजा बिनधास्त खाल्ल्या जातात. पण हे लक्षात घ्यायला हवं की ,
हे पदार्थ कमी फॅट किंवा कॅलरीजचे असतात. झिरो कॅलरीजचे नव्हे. त्यामुळे
ते भरपूर खाल्ल्याने शरीरावर त्याचा परिणाम होतोच. त्याऐवजी मग आपण
घरातल्या घरात केलेली नेहमीची एक करंजी खाल्ली ,
तर चालू शकेल. समाधानही मिळेल. पण तेवढ्यावरच थांबलं पाहिजे. लो फॅट
पदार्थ कदाचित ऑलिव्ह ऑइलमध्ये तळले जात असतील किंवा तेल टिशू पेपरने टिपून
काढले जात असेल , पण म्हणून ते शरीराला अपायकारक नाही , असा समज चुकीचा आहे. किंवा बेक करंजीमध्ये तेलाचा वापर होत नाही , पण त्यात मैदा , साखर , खोबरं हे जिन्नस तर असतातच. म्हणजे मग या पदार्थाने नेमकं काय साध्य होणार ?
तसंच दुकानातील फराळ बनवताना एकाच तेलात बरेच पदार्थ तळले जातात. यामुळे
तेल जाड होतं आणि त्यातलं फॅट्सचं प्रमाण वाढतं. घरात कमी प्रमाणात पदार्थ
बनत असल्याने हा धोका उद्भवत नाही. म्हणूनच फराळाला पर्याय शोधण्यापेक्षा
घरातीलच फराळ अवाक्यात खाल्ला , तर प्रश्नच येणार नाही , असा सल्ला लालवानी यांनी दिला. सणासुदीला घरात गोड हवं असल्यास मिठाईऐवजी मलईरहित दुधाची लापशी किंवा खीर करावी , अशी छोटीशी टिपही त्यांनी दिली.
थंडीमध्ये शरीराचं संरक्षण होण्यासाठी दिवाळीत अशा प्रकारचे खूप कॅलरीज
असलेले पदार्थ बनवण्याची प्रथा सुरू झाली. पूर्वी माणूस अंगमेहनत करत असे.
त्यामुळे त्याच्या शरीरात अनेक कॅलरीज जळत असत. पण आता ती परिस्थिती उरलेली
नाही. अनेक सुख-सोयी आल्याने कदाचित एवढ्या कॅलरीज असलेल्या पदार्थांची आज
गरज नाही. म्हणून काळानुसार त्यात बदल व्हायला हवेत , असं मत केईएमचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुधीर जुवेकर यांनी मांडलं. फराळात हे नको , ते हवं , हे करण्याआधी कुटुंबियांच्या वयोगटाचा विचार करायला हवा. वयोवृद्धांना कडबोळी ,
चकली हे पदार्थ देण्याचं टाळावं. लहान मुलांना सगळा फराळ चालू शकतो. कारण
त्यांना हे लो कॅलरीज किंवा लो फॅटचा फराळ देऊन उपयोग नाही. फराळाचा आकार
मात्र लहान करावा. म्हणजे बेसनचे लाडू करण्याऐवजी त्याच्या वड्या कराव्यात
किंवा करंजा , चकल्या लहान आकाराच्या कराव्यात , असा उपायही त्यांनी सुचवला.
कॅलरीजचा फंडा
उदाहरणार्थ एका मोठ्या पंजाबी समोस्यामध्ये १५० कॅलरीज आहेत. छोट्या डाएट
समोस्यात ३० कॅलरीज असतील. पण लहान समोसे चार ते पाच खाल्ले तर गणित सारखंच
होतं. म्हणून नॉर्मल पदार्थ भूक शमवण्यासाठी नाही , तर फक्त चवीपुरते खाल्ले तर आपलं समाधानही होतं आणि कॅलरीजचं गणितही हाताबाहेर जात नाही.
No comments:
Post a Comment