Sunday, 2 December 2012

मधल्या वेळचं खाणं


मधल्या वेळचं खाणं


डाएट करणारे किंवा न करणारे सगळ्यांचीच एका बाबतीत पंचाईत होते , ती म्हणजे मधल्या वेळचं खाणं. दोन्ही वेळच्या जेवणाचं डाएट काटेकोरपणे पाळलं जातं ; पण मधल्या वेळी नेमकं काय खायचं ? याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात.

पूर्वीचे लोक सकाळी नाश्ता , दुपारचं जेवण आणि रात्रीचे जेवण असा साधा , चौरस आहार घेत. पण त्यांचा व्यायाम आणि चालणं भरपूर होतं. खाणंही फक्त घरगुती , पोषक असायचं. काळ बदलला आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही आमूलाग्र बदल झाला. खाण्याचे खूप पर्याय उपलब्ध झालेत. आपली बैठी जीवनशैली लक्षात घेता दर दोन ते तीन तासांनी खाणं जास्त योग्य ठरतं. अशा प्रकारे खाल्ल्यानं वजन नियंत्रणात राहातं. मधुमेहींनाही याचा फायदा होतो. पित्त होत नाही तसंच पचनही चांगलं राहातं. लहान मुलं , गरोदर स्त्रिया यांच्यासाठीही अशाप्रकारे थोड्या थोड्या वेळानं खाणं चांगले असतं. परंतु काही वेळेला सारखं काय खायचं असा मोठा प्रश्न पडतो.

मधल्या वेळेस खाण्याचे फायदे

१.वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात राहण्यासाठी
२.प्रवास करताना उर्जा टिकून राहाण्यासाठी
३.शरीराला सतत शक्ती मिळत राहावी म्हणून
४.दोन खाण्यात जास्त अंतर ठेवल्यानं खूप भूक लागते आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी भरमसाठ वाढते आणि एकूणच पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो.
५.सतत थोड्याथोड्या वेळाने खाल्ल्यानं शरीराचं चयापचय चांगलं राहातं

पण हे मधल्या वेळचं खाणं शक्य तितकं हेल्दी हवं. असे पदार्थ घरी आधीच तयार करून ठेवता येतात , तर काही पटकन करण्यासारखे असतात. मात्र , त्यासाठी काय चांगलं , काय वाईट याची समज असणं आवश्यक असतं.

काय बनवाल ?

चणे- फुटाणे : भाजलेले चणे , फुटाणे- शेंगदाणे , सोया नट्स तसंच भिजवून मोड आणलेली कडधान्यं यातून प्रथिनं मिळतात. यातील शेंगदाणे जास्त स्निग्धयुक्त असतात आणि त्यात कॅलरीज भरपूर असतात. म्हणून ते मुलांना चालू शकतात.

फळं : फळं सर्वांनाच चालतात. मधल्या वेळेस खाण्यासाठी फळं सर्वात उत्तम! किंबहुना फळं मधल्या वेळेतच खावीत , कारण तेव्हा पोट रिकामं असल्यामुळे त्यांचं पचन चांगलं होतं आणि त्यातील जीवनसत्वं , क्षार शरीरात नीट शोषली जातात.

लिक्विड : काही प्यावंसं वाटत असेल , तर लिंबूपाणी , शहाळ्याचं पाणी , ताक , भाज्याचं सूप , सोया मिल्क असे पदार्थ चांगले. शीतपेयांपेक्षा फळांचे रस केव्हाही चांगले.

हेल्दी स्नॅक्स : बिस्किटं ही मधल्या वेळी खाण्यास सोपी असली , तरी बेकरीचे पदार्थ सतत खाणं चांगलं नाही. त्यापेक्षा घरचं दही खावं किंवा राजगिऱ्याचा लाडू , ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा , भडंग असे पदार्थ जवळ ठेवावेत. मुलं आणि गरोदर स्त्रिया यांनी साजूक तुपातील लाडू आणि चिक्की असे पदार्थ खावेत.

इतर : सुके मेवे खूप पोषक असतात ; पण त्यात कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे ते प्रमाणात खावेत. कॉर्नफ्लेक्स , राजगिरा लाह्या , व्ह‌िट फ्लेक्स , ओट्ससारखे पदार्थही पटकन खाता येण्यासारखे आहेत.

हे टाळा : चिप्स , फास्ट फूड , बर्गर्स , मिठाई , वडा- पाव हे पदार्थ कितीही चविष्ट असले तरीही ते मधल्या वेळेस खाणं टाळावं.
मधल्या वेळेस खाताना खालील गोष्टींचा विचार करावा-

१.काही हेल्दी पदार्थ नेहेमी जवळ ठेवावेत म्हणजे ऐनवेळी अरबट-चरबट खाण्याची वेळ येणार नाही.
२.घरीसुद्धा हेल्दी पदार्थ तयार करून ठेवा. फळंही आणून ठेवा.
३.एखाद्या वेळी फास्टफूड खावं लागलंच तर प्रमाणात खावं.
४. गरज नसताना , चाळा म्हणून तोंडात टाकणं टाळा , नाहीतर कॅलरीज वाढायला वेळ लागणार नाही. 

No comments:

Post a Comment