Sunday, 2 December 2012

उर्जेचं पंचतंत्र


उर्जेचं पंचतंत्र

काम करताना उर्जेची आणि उत्साहाची कमी जाणवणं अत्यंत साहजिक आहे. अशावेळी उगाचच काहीबाही खात राहण्यापेक्षा पौष्टिक खाद्य खाणं कधीही उत्तमंच. खाली दिलेले पाच पदार्थ तुमच्या शरीरातली ताकद वाढवून तुमच्यात उत्साह निर्माण करायला नक्कीच मदत करतील.

केळी

केळी ही नेहमी चेतासंस्था आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. केळ्यात असणाऱ्या पोटॅशिअम आणि साखरेच्या योग्य प्रमाणामुळे केळी खाल्ल्यावर ताबडतोब ऊर्जा मिळते. एका मोठ्या केळ्यात जवळपास १०० कॅलरीज असतात. बाकीच्या फळांप्रमाणे त्यात पाण्याचं प्रमाण जास्त नसून घन पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. थकव्यातून त्वरित मुक्तता मिळवण्यासाठी केळं खाणं कधीही चांगलं.

अंजीर

लोह आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण अंजिरात असते. यामुळे शरीरातील रक्ताची गुणवत्ता वाढून हाडं बळकट होतात. मांसाहारी आणि रिफाईन पदार्थांमुळे वाढणारं पित्तं कमी करण्याचं काम अंजीर करतो.

बदाम

सगळ्या सुक्या मेव्यात बघायला गेलं तर सर्वात जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर बदामात असतं. त्यातल्या पोषण तत्वामुळे बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हटलं जातं. असं असलं तरी वाटीभर बदाम मात्र खाऊ नयेत. एकावेळी बदाम खाण्यावर मर्यादा ठेवावी नाहीतर वजन वाढण्याचा धोका असतो.

मोड आलेली कडधान्ये

प्रोटीनचे प्रमाण वाढवणारी आणि पोटभर असली तरी कमीत कमी कॅलरी पुरवणारी कडधान्यं खाणं नेहमीच फायदेशीर ठरतं. मूग , चणे , राजमा अशी मोड आलेली कडधान्य खाल्ली पाहिजेत.

दही

दही हा एक पोटभर आणि चविष्ट पदार्थ आहे. तुम्हाला नुसतं दही आवडत नसेल तर हल्ली त्यात अनेक फ्लेवर्स मिळतात. पचनाला आवश्यक असणारे घटक दह्यात असल्याने पचनक्रिया सुलभ होते. अन्नपचनासाठी याचा उपयोग होतो. शिवाय प्रतिकारशक्तीही वाढत असल्याने भूक लागली असल्यास दह्याशिवाय चांगला पर्याय नाही.

टिप्स

बनाना स्मूदी बनवण्यासाठी केळी , पाणी आणि दुध एकत्र करा. मिक्सरमध्ये घालून त्यात थोडा मध घालून थोडीशी घट्ट स्मूदी तयार!
ताज्या किंवा सुक्या अंजिराच्या फोडी सकाळच्या नाष्ट्यात खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते.
फळं खाताना त्यावर बदामाचे पातळ काप घालून खा.
मोड आलेली कडधान्यं ब्रेडमध्ये घालून सँडविचसारखं करून खा.
ताजी फळे आणि मधाबरोबर खाल्लेल्या दह्याची चव चांगली लागते. 

 

No comments:

Post a Comment