Friday, 7 December 2012

भात, शेंगदाणे आणि आंबा


भात, शेंगदाणे आणि आंबा


' भात खाल्याने माणूस जाड होतो का ', ' शेंगदाण्याने कोलेस्ट्रेरॉल वाढतं ना ', ' आंब्यामध्ये भरपूर फॅट असतं असं म्हणतात ', ' भात सोडला तर आम्ही बारीक होऊ का ', ' उपवास करू की नको ' ....... पारंपरिक समज-गैरसमज आणि डाएटबद्दल कुतुहल याचा उहापोह करणारा चर्चात्मक कार्यक्रम माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात शनिवारी पार पडला. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांना थेट प्रश्न विचारून प्रेक्षकांनी आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.
' मटा संवाद ' उपक्रमाअंतर्गत ' फिट राहण्याचा दिवेकरी मंत्र ' या कार्यक्रमात शनिवारी प्रख्यात आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या डाएट टिप्स ऐकण्यासाठी आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला गर्दी केली होती. अपेक्षेपेक्षाही अधिक मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहिल्यामुळे रुईया कॉलेजचे लहान सभागृह अपुरे पडू लागले. अखेर सर्व प्रेक्षकांना या सभागृहातून रुईया कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरील मोठ्या ऑडीटोरीअममध्ये हलवण्याची व्यवस्था कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुहास पेडणेकर यांनी केली. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात ऋजुता दिवेकर यांनी प्रेक्षकांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या मनातील समज-गैरसमज दूर केले. ' जेवणाने मन बनतं ', ' राइस इज नाइस ', ' तुमचं पोट आणि जीभ हेच तुमचे खरे डाएट गुरू आहेत ', ' लोकल फूड खा आणि आपल्या खाद्यसंस्कृतीचा आदर करायला शिका ' असे अनेक कानमंत्रही ऋजुता दिवेकरांनी यावेळी दिले. प्रेक्षकांनी आहारविषयक तसेच व्यायाम , योगासनं आदी संदर्भात अनेक प्रश्न विचारले. सकाळी उठल्यावर काय खावं इथपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणि अगदी उपवास करावा की करू नये इथपासून ते व्हेज-नॉनव्हेजपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांनी जाणून घेतली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ऋजुता दिवेकर यांनी आपण या क्षेत्रात कशा आलो याबद्दल सांगताना , रुईया कॉलेजमध्ये रसायनशास्र विषय शिकत असतानाच आहारशास्त्राची आवड निर्माण झाल्याचे सांगितले. रसायनशास्त्राची पार्श्वभूमी असल्याने आहारशास्त्र शिकणे सोपे गेल्याचे त्या म्हणाल्या. रसायनशास्त्र या विषयात आवड निर्माण होण्याचे श्रेय त्यांनी कॉलेजचे विद्यमान प्राचार्य डॉ. प्रा. सुहास पेडणेकर यांना दिले. पेडणेकर सरांकडून रसायनशास्त्र शिकल्याने पुढे अन्नाचे रसायन जाणून घेण्यात रस वाटला , असेही त्या म्हणाल्या. आपल्या मनोगतातून त्यांनी भात , शेंगदाणे आणि आंबा या पदार्थांच्या सकारात्मक बाजू समोर आणल्या. आंबा , चिकू , सीताफळ या फळांमध्ये फॅट नसून ही फळे खाल्ल्याने मधुमेह कमी होतो , आपण लहान मुलांच्या जेवणाची सुरुवात भाताने करतो मग तो भात वाईट कसा असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेंगदाण्याने कोलेस्ट्रेरॉल वाढत नाही असे सांगतानाच त्यांनी नुसते सलाड्स खाण्यापेक्षा शेंगदाण्याचे कूट घालून कोशिंबीर करून खा असा सल्ला दिला.

No comments:

Post a Comment